सोमेश्वरनगर | रमेश कदम
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी दौरा होत असून, या दौऱ्यादरम्यान मुरूम येथील युवा नेते हरिश्चंद्र जगताप यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. त्यामुळे पश्चिम बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा रविवार, दि. १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता मुरूम येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष राजेंद्रबापू जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, प्रवीणदादा भोसले अध्यक्ष यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडल , तालुका महिला अध्यक्षा वनिता बनकर, युवक अध्यक्ष संदीप देवकाते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हरिश्चंद्र जगताप आणि अमित बारवकर यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम बारामतीतील या प्रवेशामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस चालना मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, नुकतेच बार्शीचे माजी आमदार कृष्णराव जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यानिमित्त युगेंद्र पवार हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजीकाका काकडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.
या दौऱ्यामुळे पश्चिम बारामतीतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत असून, पक्षप्रवेश सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments